CAA Protests : आजही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधातील आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं आहे. अशातच आजही देशात अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनं करण्यात येणार आहेत. एवढचं नाहीतर, आंदोनांच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
প্রেক্ষাপট
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलनं होताना दिसत आहेत. आज शुक्रवारीही देशात या कायद्याविरोध्यात आंदोलनं करण्यात येणार आहेत. हा कायदा लागू झाल्यापासून देशात या कायद्याविरोधात अनेक लोक आंदोलनं करत आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं आहे. अशातच आजही देशात अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनं करण्यात येणार आहेत. एवढचं नाहीतर, आंदोनांच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये आसाम, जम्मू काश्मीर आणि दिल्ली यांसाख्या शहरांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये कायद्याविरोधात रॅली
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पुन्हा एकदा कोलकात्यात मोठी रॅली काढणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निगराणीखाली जनमत जमवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हानही ममता बॅनर्जींनी मोदींना दिलं आहे.
दिल्लीत आजही सुरू राहणार आंदोलन
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आजही जामिया मीलिया इस्लामियामध्ये आंदोलन सुरू राहणार आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आजही दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियात विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. शुक्रवार असल्यानं आधी विद्यार्थी नमाज पठण करतील आणि त्यानंतर दुपारी 2 पासून आंदोलन सुरु होणार. या आंदोलनात जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह इतर संघटनाही सहभागी होणार आहेत.
एवढचं नाहीतर या कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीतील जामा मशीदीतही आंदोलन करण्यात येणार आहे. CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी दुपारी एक वाजता जामा मशीदीपासून जंतर-मंजरपर्यंत एक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखरही सहभागी होणार आहेत.
टीएमसीची बैठक
शुक्रवारी जयपुरमध्ये भाजपकडून NRC आणि CAA च्या समर्थनार्थ भव्य रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शहीद स्मारक, गव्हर्न्मेंट हॉस्टेलपासून रॅली सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बंगालमध्ये NRC आणि CAA कायदा लागू करण्यासाठी सक्तीने विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी टीएमसी नेते आणि आमदारांना बैठकीत सहभागी होण्यास सांगितले आहे.
लखनौसह देशभरात करण्यात आली आंदोलनं
देशभरातील आंदोलनाची तीव्रता गुरुवारी उत्तरप्रदेशमध्येही पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून डाव्या संघटनांचं आंदोलन सुरु होतं. या आंदोलनाला लखनौमध्ये हिंसक वळण लागलं. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लखनौमध्ये दोन दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. एवढचं नाहीतर गुरुवारी अहमदाबादमध्ये या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. मुंबईतही ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात तब्बल 10 हजार आंदोलक सहभागी झाले होते. यासाठी 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. दिवसभर हे आंदोलन अगदी शांततेत पार पडलं. मुंबईतील आंदोलनाला फरहान अख्तर, जावेद जाफरी, हुमा कुरैशी आणि सुशांत सिंह यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते.
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशभरात जामियातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याची माहिती मिळत आहे. तसेच काल (गुरुवारी) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, कर्नाटकातील मंगळूरू, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईसह देशातील इतर अनेक शहरांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं करण्यात आली.
संबंधित बातम्या :
मुंबईतील हजारोंचा मोर्चा शांततेत पार पडण्यामागचे रहस्य
CAA Protest | देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नागरिक रस्त्यावर; अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण
CAA आणि NRC बद्दल तुमच्याही मनात आहेत 'हे' प्रश्न, जाणून घ्या नेमकी उत्तरं
CAA Protest | कितीही आंदोलनं झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -